व्यथेची कथा होते,
मनाचा दगड होतो,
स्वप्न तसचं कट्ट्यावर उन्हं शोधत पडून राहतं…
बंधनं लागतात,
बंधनं लादतात, मी भटका होत नाही,
आखून स्वतः भोवती मर्यादा,
मी सीमा ओलांडत नाही ..
दिलास्याचे लावून दार,
अंधाराची झोपडी बनवतो,
गर्दीच्या गर्दितला एक दर्दी होत
आयुष्याला एक खिडकी बांधतो…
झोपडी तितकी कठोर असते,
आयुष्य सरसावत पुढे नेते,
मन मात्र लवचिक होऊन त्या खिडकीबाहेर पाहत राहतं…
खिडकी खोचक बोलत राहते,
प्रश्नांची उत्तरंही देते,
प्रत्येक उत्तराच वास्तव होतं हा भ्रम आपला तोडून जाते…
माझ्या त्या खिडकीसमोर एक डोंगर उभा राहतो,
मला माझ्याच उत्साहाचा झरा खळाळून दाखवतो,
शेवटाला मी घालतो मनाला तुटलेल्या सिमांची समजूत,
नि हातात धीराची काठी घेऊन टाकतो पाऊल आयुष्याबाहेर…
तो दिवस सोनियाचा म्हणत मी स्वतःची दृष्ट काढतो,
वेळ ती मोक्याची नि काय यमदूत येऊन झडप घालतो,
वेळेचं अन् आयुष्याचं जुळून येतं नेमकच,
अन् तो दिवस आयुष्याचा शेवटचा दिवस बनून जातो.
मौतीला येणारे अनेक चेहरे बोलत राहता,
चांगला माणूस होता,
कुणीच बोलत नाही,
“तो आयुष्य जगून गेला,
तो आयुष्य जगून गेला…”
समाजाला वास्तव म्हणायचं, आयुष्याला घर म्हणायचं,
मनाला दरवाजा म्हणायचं, स्वप्नांना खिडकी म्हणायचं, तरी आपण मुक्त होतो का…?
-पूजा ढेरिंगे
तुम्हाला हेही आवडेल- /http://manmarziyaan.in/birth-of-a-baby-girl/