धांदल उडते म्हणा नाहीतर आत्मविश्वास नसतो,
बाईचं पहिल्यांदा निर्णय घेताना हे असं होतं!
बाई निर्णय घेताना सगळं चौफेर पाहते,
आजूबाजूच्या चौघांचे विचार घेते,
मग हळूच त्यालाही विचारते, तुला काय वाटते?
मग तोही सवयीने त्याचं मत देतो.
पण त्याचं मात्र वेगळं असतं,
ती गोष्ट घडल्यानंतर किंवा घडायच्या एक मिनिट आधी तो सांगतो…
मग यात त्याचा अनुभव म्हणा नाहीतर सवय…
त्याला कुणालातरी विचारून निर्णय घेण्याची गरजच नसते.
बाईचं मात्र नेमकं असतं,
तिला गोष्टी अंगावर येऊ द्यायच्या नसतात,
कारण ती पहिल्यांदा असं काहीतरी करत असते,
पहिल्यांदा असलं तरी शेवटचं ठरायला नको म्हणून तिचं प्रत्येक पाऊल ती काचेवर पाय दिल्यासारखे टाकत असते.
त्याला काचेवर रेंगाळून काच फुटली तरीही पुढची संधी असते,
तिला मात्र एका संधीच सोनं झालं तर आयुष्याची चांदी नाहीतर पुन्हा ते रस्ते बंद!
त्या एका अपयशानंतर पुढे करायला जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नांच्या वेळी हे आणि एवढंच ऐकावं लागणार हे तिला ठाऊक झालंय आता…
अनुभवाने माणूस शिकतो म्हणता,
पण बाईच्या आयुष्यात बाहेरच्या जगातल्या अनुभवांची प्रॅक्टिकल कमीच असतात…
मग जेव्हा जेव्हा ती धडपडते ते पहिल्यांदा आणि शेवटचं…
ही अनुभवांची प्रॅक्टिकल कमी पडल्याची खंत वाटत राहते,
मनाला बाई म्हणून जन्मल्याच दुःख नाही पण समाजाने लावलेली बाईची चूल-मुलची चौकट बोगस आणि निकृष्ट आहे.
त्यामुळे कुणीतरी धडपडलं म्हणून त्याला काही जमतच नाही म्हणण्यापेक्षा त्याला प्रोत्साहित करा,
तुमच्यामुळे कुणीतरी पुन्हा नवा प्रयत्न करेल,
त्याच्या आयुष्यात याहून मोठ्ठा सण नसेल बघा!
– पूजा ढेरिंगे
तिला सर्व रुजण्यापासून मोठं करण्यापर्यंत आणि तिथून ते या जगात सोपावण्या पर्यंत सर्वांसाठी तयारी करायची असते, आणि खर्च व्हायचं असत……..हे खूप जिकिरीचं आणि कोमल असत……….
Blog साठी thanks…….☺🙌🌿