मुला, स्वातंत्र्य आणि आई वाट पाहतेय!

आज मी तुला मोबाईल नाही घेऊ दिला. तुला हवा होता तरी मी तो खेचला.
तुझ्या रडण्याचा त्रास झाला, परंतु हा त्रास पुढे होणाऱ्या त्रासापेक्षा कमी वाटला…
आज तुला मी मोबाइल नाही दिला. किंबहुना आज मी तो मुद्दाम देण्याच टाळलं.. कालपर्यंत तू मला माझं काम करू देत नाही म्हणून मी मुद्दाम तुझ्या हातात मोबाइल द्यायचे, पण आज तू पकडलेल्या घट्ट बोटातला स्पर्श मी पहिल्यांदा इतक्या आर्ततेनं अनुभवला. मला जायचं असूनही तु माझं बोट सोडायला तयार नव्हता. किती आर्जव होती तुझ्या कोमल स्पर्शात जणू त्या स्पर्शातून तु मला समजावलं ‘कल्पनेतलं विश्व नंतर, आधी तू हवीस जवळ !’

आज तुला माझी बंधनं जाणवतील, टोचतील, या आधीही जाणवली असतील आणि मोठा होशील तेव्हा अजून तीव्रतेने जाणवतील. तरी तू सुटण्याचा प्रयास नाही करणार, पण एक दिवस येईल जेव्हा तू या पाशातून मोकळा होशील.
दोन रस्ते असतील. एकीकडे मी उभी असेल, दुसरीकडे तुझं स्वातंत्र्य…
तू ते निवडशील… गैर काही नसेल, पण तुझ्या त्या कोवळ्या स्पर्शाचा मला मोह जडलेला असतो. या स्वातंत्र्यात सुरुवातीला वाहत जाशील, आनंद घट्ट भरेल तुझा. त्या स्वातंत्र्यासाठी भांडणं टोकाला जातील, दुसर्या दिवशीही तू हे स्वातंत्र्य तेवढ्याच रुचीने, स्वारस्याने स्वीकारशील. एका नवजात आझाद पंछीसारखं ईकडुन तिकडे घिरट्या घेशील. तिसर्या दिवशी तू स्वतःला एका ऐशोआरामात राजबिंड्याप्रमाणं झोकून देशील .चौथ्या दिवशी तुला गर्व होईल तुझ्या स्वातंत्राचा, म्हणून तू दिशा शोधणार नाही, भरकटत जाशील. तुझी गती खुंटेल आणि कालांतराने मिळालेलं स्वातंत्र्य रुटीन कार्यक्रम होऊन त्यातील स्वारस्य नष्ट होईल.
तोपर्यंत तुझं शिक्षण झालेलं असेल.एव्हाना तू ऑफिसात कामालाही लागला असशील आणि आज तुझं प्रोमोशन होईल पण आज तू थकलेला असेल, झगमगत्या दुनियेच्या त्याच त्या स्वातंत्र्याने आणि दिखाव्याने… काही मिळवण्याची आस मनात उरणार नाही, तुझं अस्तित्व तुला जाणवणार नाही. तेव्हा कदाचित तू मागे वळून पाहशील. तुला तुझं बेसिक आयुष्य आठवेल, मन दाटून येऊन तोच स्पर्श आणि तेच कोवळेपण घेऊन तु एकवार मागे वळून पाहशील,
“मी तिथेच असेल, जिथे तू मला सोडलं होतंस.”
तेव्हा तुला मी समजावू शकेल तुला बंधनात ठेवण्याचं कारण.
‘तुझी स्वातंत्र्याची ओढ.’
आपल्या आयुष्यात आपल्याला एकच गोष्ट चिरकाल जीवंत ठेवू शकते, ती म्हणजे ‘काहितरी मिळवण्याची ओढ/ इच्छा.’
कुठलीतरी गोष्ट मिळवायची असेल तरच त्या दिशेने प्रयत्न केले जातात आणि या ‘स्वातंत्र्याची’ आस तुझ्या डोळ्यात चकाकताना मला दिसली होती आणि त्या आकांक्षेमुळे नि त्या ओढीखातर तू घडत होतास. या दरम्यान मी एक आई तर बनले, पण तुझ्याशी तुझ्याएवढं होऊन तुला समजावण्याचं सामंजस्य नाही आलं माझ्यात.
आज तू मोठा होऊन या नात्याची नाळ तर खूप आधी तुटली गेलीय आणि अंतरही वाढलंय, पण तरीही आपल्या नात्यासाठी तुला समजून घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. तू मोठा झालास मलाही मोठं होऊ दे आपल्या नात्यासाठी काही काळ उरू दे, आज आहे या म्हातारपणाच्या वयात तिथे कसलीच शाश्वती नसते मला फक्त तुझ्या सहवासाची ओठ जिवंत ठेवते. थोडा जनरेशन गॅप कमी करू एक पाऊल मी टाकते, त्यावर तेच दुडूदुडू धावणारं पाऊल तु टाक. एवढंच एक स्वप्न पहायचं राहून गेलेलं आज तुझ्या दुराव्याने कमी जाणवली, लहानपणी तुला दिलेली कुशी आज मला मोहित करतेय. या मृत्यूकडे झेपावणाऱ्या जीवाला तेवढीच आस उरलीय !
– तुझीच आई

Please follow and like us:
error

1 thought on “मुला, स्वातंत्र्य आणि आई वाट पाहतेय!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *