तुला तुझ्या मनात रमवणारा “तुझा छंद”.

तुला तुझ्या मनात रमवणारा “तुझा छंद”.

तुझ्या मनाला या जगातला सगळ्यात सुंदर बगीचा बनवणारा छंद!
जो तुला गुंतवून ठेवत राहतो कुठल्याही प्लॅनिंग शिवाय. तुझं चित्त त्याच्याशी विनापरवानगी एकरूप होत जातं.
तुझे डोळे, मन, कान आणि आत्मसंवेदना एकाच बिंदूला येऊन भेटतात. एक रमणीय, आविष्कारी गूज साधतात, मिळून एक जाणतेपणाचा वॉक घेतात. वॉक विदाऊट थॉट! हा वॉक करताना समाजाला मनात ओढून घेऊन त्यावर कधी चर्चा सुरू होते आपलं आपल्याला कळत नाही. हा मनातल्या विचारांचा घोळका, संवाद, वाद, प्रतिवाद याचा मेळ घडताना माणूस स्वतःचा मित्र बनलेला असतो. हा संवाद वेगळा असतो. आइतवारी केवळ घड्याळाच्या काट्यांचा आवाज असताना मनाच्या प्लॅटफॉर्मवर एकच कार्यक्रम चालावा एवढी आर्तता त्या स्वभेटीत असते. मग त्यात उडावे कुंचल्यातून आयुष्यातल्या प्रसंगांचे शहारे कॅनव्हासवर, नाहीतर आयुष्याच्या गजबजाटात पुस्तकातली एक ओळ वाचून त्यावर विचारांचा संवाद सुरू करावा निवांत, नाहीतर खूप डिप्रेशनचा त्रास होतोय जाणून घेऊन एका जुन्या धूळ खात पडलेल्या डायरीचं दार उघडावे नि जे येईल जसं येईल कुठल्याच प्रवाहाशिवाय मुक्त करत जावं बांधून ठेवलेल्या डिप्रेशनला, नाही खूप काही तर जपत स्वयंपाकाचा छंद बनवावी आवडती डिश प्रत्येक सामग्रीला ओळखून, नाहीतर बसावं पारावर बायांनी नि माराव्या गप्पा अगदी कोणत्याही विषयावर, मुक्त करावं स्वतःला स्वतःच्या बंधनातून अन् एक दिवस सुटका करून घ्यावी जबाबदारीच्या बाहुपाशातून, एका दिवसासाठी!

बाकी दिवस जबाबदारीचे, एक दिवस हातचा राखून ठेवावा स्वतःच्या छंदासाठी !

हा योगायोग दुर्मिळ असतो. रोजच्या आयुष्यातल्या वास्तविक आगीने विसावा घ्यावा पणतीचा! नि मग्न होऊन जावं एकमेकांच्या पूरक विश्वात इतकी आश्वासक भेट असते आत्मसंवेदना आणि मनाची!
अशी भेट जी माणुसकीच्या जिवंतपणाला कुरवाळत लहानपणी जन्मलेले मूल जिवंत ठेवते.
तुमचा छंद म्हणजे ते लहानपणीचे मुलचं तर आहे!
ज्याच्या चराचरात अगरबत्तीच्या धूरातून निघावा तसा शुद्ध, वैश्विक विचारांचा पसारा उरलेला असतो… ते छंद नावाचं मुल जपून ठेव! बस इतकंच!

Please follow and like us:
error

1 thought on “तुला तुझ्या मनात रमवणारा “तुझा छंद”.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *